नागपूर येथे २१ नोव्हेंबरला रंगणार सहावे राज्यस्तरीय ‘रसिकोत्सव’ साहित्य संमेलन; डॉ. गिरीश गांधी भूषविणार संमेलनाध्यक्षपद

नागपूर येथे २१ नोव्हेंबरला रंगणार सहावे राज्यस्तरीय ‘रसिकोत्सव’ साहित्य संमेलन; डॉ. गिरीश गांधी भूषविणार संमेलनाध्यक्षपद
नागपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

मराठी भाषेचा प्रसार , वाचनसंस्कृतीची जोपासना आणि नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या मुंबईच्या शुभंकरोति साहित्य परिवाराच्या वतीने येत्या २१ नोव्हेंबर २०२६ रोजी उपराजधानी नागपुरात सहाव्या राज्यस्तरीय ‘रसिकोत्सव मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भाचे सांस्कृतिक नेतृत्व करणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि रसिकाग्रणी डॉ. गिरीश गांधी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर ‘इमव्हर्स ए-आय’च्या संस्थापक अध्यक्षा तथा साहित्यप्रेमी प्रीती रामकृष्णन यांच्या हस्ते या संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.
साहित्य निर्मितीमध्ये रसिक हाच केंद्रबिंदू असतो आणि प्रामाणिक रसिक हा मुळात अव्यक्त प्रतिभावंतच असतो, या भूमिकेतून थेट साहित्य रसिकांमधूनच संमेलनाध्यक्ष आणि उद्घाटकांची निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारचा हा साहित्य जगतातील आगळावेगळा प्रयोग मानला जात असून, या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. माया दिलीप यावलकर जबाबदारी सांभाळणार आहेत. संमेलनाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाकवी डॉ. सुधाकर गायधनी आणि ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
दिवसभर चालणाऱ्या या साहित्य उत्सवात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक व वाङ्मयीन सत्रांची रेलचेल असेल. यामध्ये श्रीनिवास नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक व मराठी कविसंमेलन रंगणार असून, कोकण विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दर्जेदार ‘गझलरंग’ मैफल आयोजित करण्यात आली आहे.
साहित्य क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या सहा मान्यवरांना या संमेलनात ‘शुभंकरोति गुणगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये राजश्री पाटील, सना पंडित, डॉ. मेधा कानेटकर, न्यायमूर्ती किशोर रोही, डॉ. मीना सु. बंदे आणि धनश्री कि. पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय, वाचनसंस्कृतीला गती देण्यासाठी संस्थेने महिनाभर राबविलेल्या ‘वाचनयात्रा’ या विशेष उपक्रमातील सहभागी वाचकांना ‘वाचनरत्न पुरस्कार’ प्रदान केले जातील. महाकवी डॉ. सुधाकर गायधनी यांच्या ‘महाकाव्य समग्र देवदूत’ या जगप्रसिद्ध कृतीचे समूह अभिवाचन करणाऱ्या साहित्यप्रेमींचा तसेच समूहाच्या माध्यमातून सातत्याने लेखनसेवा देणाऱ्या लेखकांचाही यावेळी गौरव केला जाईल.
चक्रधर स्वामी, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विदर्भभूमीत साहित्यिक, पत्रकार, कवी, गझलकार आणि वाचक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. शुभंकरोति साहित्य परिवाराच्या संस्थापिका सौ. सोनाली जगताप, मुख्य प्रशासिका डॉ. माया यावलकर आणि अध्यक्षा प्रा. सुमती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची तयारी सुरू असून, विदर्भासह राज्यभरातील साहित्य रसिकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.



