ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिक्षक ,पदवीधर निवडणूक : मतपेटीतून उलगडणार उमेदवारांचे भवितव्य; पुणे विभागासह राज्यात चुरस, १८२ जणांची प्रतिष्ठा पणाला

शिक्षक ,पदवीधर निवडणूक : मतपेटीतून उलगडणार उमेदवारांचे भवितव्य; पुणे विभागासह राज्यात चुरस, १८२ जणांची प्रतिष्ठा पणाला

​पुणे : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या चुरशीच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होत आहे. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर, तसेच पुणे व अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांत शुक्रवारी सरासरी ७२.९६ टक्के मतदान पार पडले. सुशिक्षित आणि प्रबुद्ध मतदारांच्या या निवडणुकीत यंदा सर्वपक्षीय दिग्गज आमनेसामने ठाकल्याने राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून, तब्बल १८२ उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेट्यांमधून उघड होणार आहे. बालेवाडी क्रीडा संकुलासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती येथील मतमोजणी केंद्रांवर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांची गणिते कोणाच्या बाजूने झुकतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

​पुणे विभागात काटाजोड; महायुती अन् महाविकास आघाडी आमनेसामने

​पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागांवर झालेला संघर्ष यंदा विशेष लक्षवेधी ठरला आहे. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या विभागात पदवीधरसाठी ६२.७८ टक्के, तर शिक्षकांसाठी तब्बल ८५.८७ टक्क्यांचे विक्रमी मतदान नोंदवले गेले. पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात थेट आणि प्रतिष्ठेची लढत रंगली आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुनील मोदी यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी रिंगणात उडी घेतल्याने मतांची मोठी विभागणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यातील लढत अटीतटीची झाली असून, अपक्ष  उमेदवारांनीही  तगडे  आव्हान  उभे केले  असल्याने पदवीधर व शिक्षकांनी नेमका कोणावर विश्वास दाखवला, याचा फैसला आता काही तासांवर आला आहे.

​’लक्ष्मीदर्शन’ आणि संस्थाचालकांची पडद्यामागील फिल्डिंग

​कधीकाळी केवळ तात्त्विक चर्चा, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि जुनी पेन्शन योजना यावर लढवल्या जाणाऱ्या या निवडणुकीला यंदा वेगळेच वळण लागले. पदवीधर आणि शिक्षकांच्या निवडणुकीत एरवी सामान्य निवडणुकीसारखे अर्थकारण पाहायला मिळत नाही; मात्र यंदा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याची कुजबुज रंगली होती असे समजते . शिक्षण संस्थाचालक , संस्थांचे पदाधिकारी आणि प्राध्यापक-शिक्षकांच्या संघटनांना हाताशी धरून ‘कोटा’ पूर्ण करण्यासाठी पडद्यामागे तगडी रसद पुरवली गेल्याचे आरोप-प्रत्यारोप रंगले होते . संस्थांच्या मतपेढ्या शाबूत ठेवण्यासाठी शेवटच्या ४८ तासांत छुप्या बैठका आणि अर्थकारणाची चक्रे  गतिमान झाल्याची  चर्चा  होत  असल्याने यंदाची निवडणूक पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन लढवली गेल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.

​पसंतीक्रमाचा तिढा आणि निकालाची उत्सुकता

​शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांचे निकाल थेट बहुमतावर नव्हे, तर ‘पसंतीक्रमाच्या’ क्लिष्ट समीकरणावर ठरतात. मतपत्रिकांची प्राथमिक वर्गवारी आणि पन्नास-पन्नासच्या गठ्ठयांची मोजणी झाल्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेला ‘वैध मतांचा कोटा’ निश्चित केला जाईल. पहिल्या पसंतीक्रमात कोटा गाठण्यात कोणाला यश आले नाही, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या बाद फेऱ्या सुरू होतील. अनेक प्रमुख मतदारसंघात झालेली बंडखोरी आणि मतविभाजन पाहता, पहिल्या फेरीत निकाल लागणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे दुपारनंतर कल हाती येण्यास सुरुवात होईल आणि सायंकाळ किंवा मध्यरात्रीपर्यंत पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??