“कोल्हापूरच्या विकासात डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान कायम स्मरणात राहील” — खा.धनंजय महाडिक
खा. महाडिक यांनी घेतली सतेज पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट

“कोल्हापूरच्या विकासात डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान कायम स्मरणात राहील” — खा.धनंजय महाडिक
खा. महाडिक यांनी घेतली सतेज पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क*
शिक्षणमहर्षी स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरुंधती महाडिक यांनी शनिवारी डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष संजय ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी झालेल्या या भेटीत खासदार महाडिक यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी असलेल्या स्नेहबंधांना उजाळा देत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर गेल्या पाच दिवसांपासून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वपक्षीय नेते, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांची यशवंत निवासस्थानी रीघ लागली आहे. शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरसह राज्यातील विविध क्षेत्रांत हळहळ व्यक्त होत आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी बंटी पाटील यांच्याशी संवाद साधताना डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण संस्थांचे रोपटे लावले आणि पुढील काळात त्या संस्थांचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले. या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी उच्चविद्याविभूषित झाले असून, कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्राला भक्कम दिशा देण्याचे काम डॉ. पाटील यांनी केले, असे महाडिक यांनी सांगितले.
“आजच्या काळात एखादी शिक्षण संस्था सुरू करून ती यशस्वीपणे चालविणे हेही मोठे आव्हान आहे. मात्र, डॉ. डी. वाय. पाटील यांनी ज्या काळात शिक्षण क्षेत्रात काम सुरू केले, त्या काळात अनेक अडचणींवर मात करत त्यांनी विविध शिक्षण संस्थांची उभारणी केली. त्यांनी लावलेल्या रोपट्यांचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या सावलीत शेकडो पिढ्यांची जडणघडण झाली आणि यापुढेही होत राहील,” असे खासदार महाडिक यांनी नमूद केले.
कोल्हापूरच्या विकासाच्या वाटचालीत डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्राला बळ देतानाच त्यांनी सहकार, समाजकारण, राजकारण आणि उद्योग क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या संस्था आज हजारो विद्यार्थ्यांच्या आणि कुटुंबांच्या जीवनाला दिशा देत आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाचा इतिहास सांगताना डॉ. डी. वाय. पाटील यांच्या योगदानाचा उल्लेख अपरिहार्य राहील, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान खासदार महाडिक यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासोबतच्या आपल्या वैयक्तिक आठवणींनाही उजाळा दिला. सन २००४ मधील एका प्रसंगाची आठवण सांगताना त्यांनी म्हटले की, निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता संघर्ष करत टिकून राहण्याचा सल्ला डॉ. पाटील यांनी त्यांना दिला होता. “निवडणुकीतील पराभवाने खचून जायचे नसते; टिकून राहायचे असते. तरच यश मिळते. एक दिवस तू नक्की खासदार होशील,” असे डॉ. पाटील यांनी त्यावेळी सांगितल्याची आठवण महाडिक यांनी सांगितली.
डॉ. पाटील यांच्या त्या शब्दांनी आपला आत्मविश्वास वाढविला होता, असे सांगताना महाडिक भावुक झाले. व्यक्ती म्हणून डॉ. पाटील यांच्यातील मोठेपणा आणि इतरांना प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती या प्रसंगातून जाणवत होती, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांनी घडविलेली माणसे हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता पुढील पिढीवर आहे. पाटील कुटुंबीयांच्या माध्यमातून हा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा अधिक व्यापक होत राहील, असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
सौ. अरुंधती महाडिक यांनीही संजय ऊर्फ बंटी डी. पाटील आणि पाटील कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. या कठीण प्रसंगी संपूर्ण महाडिक कुटुंबीय पाटील कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनीही पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आहे. शनिवारी खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरुंधती महाडिक यांनी भेट घेतली.
दरम्यान, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि डॉ. डी. वाय. पाटील एकाच काळात राजकारणात सक्रिय झाले. त्यामुळे देसाई आणि पाटील कुटुंबीयांमध्ये जुने स्नेहाचे संबंध असल्याचे सांगत शंभुराजे देसाई यांनी डॉ. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव आदी उपस्थित होते. सर्वांनी स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांना अभिवादन करून बंटी पाटील आणि पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.



