क्राईम न्युजताज्या घडामोडीदेश विदेश

सोशल मीडियावरील सोन्याचे प्रदर्शन पडले महागात ; युट्युबरच्या घरी १ कोटींची घरफोडी, चार संशयित पोलिसांच्या जाळ्यात

क्राइम न्यूज : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावरील सोन्याचे प्रदर्शन पडले महागात ; युट्युबरच्या घरी १ कोटींची घरफोडी, चार संशयित पोलिसांच्या जाळ्यात

तमिळनाडू : वृत्तसेवा 

सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील क्षण तसेच संपत्तीचे प्रदर्शन करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा प्रत्यय तमिळनाडूतील एका घटनेतून समोर आला आहे. इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर सोन्याचे दागिने व रोकड दाखवून व्हिडीओ बनवणाऱ्या एका प्रसिद्ध महिला युट्युबरच्या बंद घराची रेकी करून चोरट्यांनी तब्बल १ कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणात कन्याकुमारी जिल्हा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही दिवसांत मुख्य संशयितासह चार जणांना अटक केली असून चोरीला गेलेला बहुतांश ऐवज हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

 ​नागरकोईल नजीकच्या थम्मथुकोणम परिसरातील व्हीआयपी गार्डनमध्ये राहणाऱ्या मधूमिता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. त्यांचे पती विनोद कुमार हे व्यावसायिक आहेत. मधूमिता आपल्या सोशल मीडिया चॅनेल्सवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून त्यांच्याकडे सोन्याचे दागिने, खरेदी आणि आलिशान जीवनशैली दाखवणारे व्हिडीओ त्या नियमित पोस्ट करत असत. काही जुन्या व्हिडिओंमध्ये त्यांनी रोकड आणि दागिन्यांचे प्रदर्शन केले होते, ज्यामुळे चोरट्यांची नजर त्यांच्या घरावर पडली.

 ​मधूमिता या आपल्या कुटुंबीयांसह तिरुनेलवेली येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या मागचे दार तोडून आत प्रवेश केला. घरात कोणी नसल्याची पूर्ण खात्री पटल्यानंतर संशयितांनी बेडरूममधील कपाट फोडून सुमारे ११८ तोळे (सोव्हरिन) सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे अलंकार आणि रोख रक्कम असा साधारण १ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रात्री कुटुंबीय घरी परतले असता दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी मागून पाहिले, तेव्हा चोरीचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

 ​स्थानिक राजाक्कामंगलम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच कन्याकुमारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने पाच विशेष पथके तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला आणि चार जणांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ९८ तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज जप्त केला आहे.

 ​पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडवणारी ठरली आहे. युट्युबरच्या एका व्हिडीओमध्ये त्यांच्या लहान मुलीच्या शाळेच्या बॅगवर शाळेचे नाव दिसत होते. त्या शाळेच्या पत्त्यावरून चोरट्यांनी युट्युबरच्या घराचा नेमका ठावठिकाणा शोधून काढला. तसेच, सोशल मीडियावरील हालचालींवरून कुटुंबीय कधी घराबाहेर पडणार याचा अंदाज घेत ही धाडसी घरफोडी करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

 ​या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर खासगी आयुष्य, मौल्यवान वस्तू आणि प्रवासाचे नियोजन उघड न करण्याचे आवाहन केले आहे. व्ह्यूज मिळवण्याच्या नादात सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष मोठे संकट ओढवून घेऊ शकते, असा इशाराही तपास अधिकाऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी आणि इतर कोणाचा यात सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??