सांगली बायपासवर पोलिसांची धडक कारवाई; पावणेदोन कोटींच्या विदेशी दारूसह १ कोटी ९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
हरियाणा येथील ट्रक चालक पोलिसांंच्या ताब्यात

सांगली बायपासवर पोलिसांची धडक कारवाई; पावणेदोन कोटींच्या विदेशी दारूसह १ कोटी ९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
हरियाणा येथील ट्रक चालक पोलिसांंच्या ताब्यात
जयसिंगपूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
गोवा राज्यातून कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीला कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी जोरदार तडाखा दिला आहे . जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगली बायपास रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने रविवारी मध्यरात्री सापळा रचून १ कोटी ७५ लाखांहून अधिक किमतीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह सुमारे पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दारूची वाहतूक करणारा २० लाखांचा अशोक लेलँड ट्रक जप्त करण्यात आला असून, हरियाणा येथील एका चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी आणि बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अनैतिक मानवी व्यापार व वाहतूक विरोधी कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार गोवा राज्यातून कर्नाटकमार्गे कोल्हापूर जिल्ह्याच्या दिशेने एका मोठ्या ट्रकमधून बनावट विदेशी दारूची मोठी खेप पाठवण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. या माहितीची तात्काळ दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि तपास पथकाला संयुक्त नाकाबंदी व कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांच्या पथकाने १६ ऑगस्टच्या रात्री जयसिंगपूर हद्दीतील कोल्हापूर-सांगली बायपास मार्गावर अत्यंत गुप्तपणे पाळत ठेवून सापळा लावला होता. दरम्यान संशयितरीत्या आलेला अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्रमांक एमएच १८ बीजी ००६७) पोलिसांनी अडवला. पोलिसांनी ट्रकचालकाची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव मुसफान ऊर्फ जावेद खान (वय ३२, रा. हरियाणा) असे सांगितले. त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पथकाने ट्रकची सखोल झडती घेतली. त्यावेळी ट्रकमध्ये वरवर इतर मालाचा भास निर्माण करून आत १८० मिली क्षमतेच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे तब्बल १ हजार ८३० बॉक्स लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.
तपासणीदरम्यान पोलिसांनी प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या याप्रमाणे एकूण ८७ हजार ८४० बाटल्या जप्त केल्या. या दारू साठ्याची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत १ कोटी ७५ लाख ६८ हजार रुपये इतकी होते. याशिवाय २० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि चालकाकडील १० हजार रुपयांचा मोबाईल असा मिळून एकूण १ कोटी ९५ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही दारू गोव्यातून नक्की कोणी पाठवली आणि कोल्हापूर-सांगली परिसरात कोणाकडे पोहोचवली जाणार होती, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्य अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.




