धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता विचारणार ‘सवाल एक कोटीचा !मराठी KBC चं सारथ्य सांभाळणार

धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता विचारणार ‘सवाल एक कोटीचा !मराठी KBC चं सारथ्य सांभाळणार
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
भारतीय सिनेसृष्टीची लाडकी अभिनेत्री माधुरी दीक्षित आता एका आगळ्यावेगळ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. टेलिव्हिजन विश्वात अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मराठी ‘KBC’ (कोण होणार करोडपती) या महाखेळाच्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन आता माधुरी दीक्षित करणार आहे. हा बहुचर्चित कार्यक्रम लवकरच ‘सोनी मराठी’ वाहिनीसह ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होत आहे.
विविध रिॲलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून रसिकांची मने जिंकणारी माधुरी पहिल्यांदाच मराठी ‘KBC’च्या सूत्रसंचालकाच्या खुर्चीत बसून ज्ञानाचा हा खेळ पुढे नेणार आहे. वाहिनीने या नव्या पर्वाची आणि सूत्रसंचालकाची घोषणा केल्यापासूनच मनोरंजन जगतात तसेच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या पर्वासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, माधुरीच्या उपस्थितीमुळे या मंचाला एक नवा ग्लॅमरस आणि आपुलकीचा स्पर्श लाभला आहे.
या शोशी जोडले जाण्यामागची भावना व्यक्त करताना माधुरी दीक्षितने स्पर्धकांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या संघर्षाला अग्रस्थान दिले आहे. तिच्या मते, मराठी ‘KBC’ हा केवळ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन कोट्यवधी रुपये जिंकण्यापुरता मर्यादित खेळ नसून, सर्वसामान्य माणसांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांचा संघर्ष, त्यांच्या कौटुंबिक कथा आणि त्यांच्या डोळ्यांतील आशा-आकांक्षा यांच्याशी थेट नातं जोडणं ही या कार्यक्रमाची खरी ताकद आहे. हॉटसीटवर बसणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांच्या ध्येयाला बळ देणे हाच या शोचा मुख्य गाभा असल्याचे तिने स्पष्ट केले.
मराठी टेलिव्हिजनवर मराठी ‘KBC’ला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. आता माधुरी दीक्षितचे देखणे व्यक्तिमत्त्व, तिचा सहज संवाद आणि स्पर्धकांशी साधली जाणारी जवळीक यामुळे हा नवा सीझन प्रेक्षकांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय पर्व ठरणार आहे.




