उत्तर कोरियाकडून अवघ्या आठवड्यात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी ; पूर्व आशियाई प्रदेशात तणाव वाढला


आंतरराष्ट्रीय : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
उत्तर कोरियाकडून अवघ्या आठवड्यात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी ; पूर्व आशियाई प्रदेशात तणाव वाढला
टोकियो : वृत्तसंस्था
उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा धडाका पुन्हा एकदा सुरू केला असून, समुद्राच्या दिशेने आणखी एक संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. अवघ्या एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत प्योंगयांगकडून करण्यात आलेली ही दुसरी चाचणी असल्याने पूर्व आशियाई प्रदेशात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जपानी किनाररक्षक दल आणि संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या पूर्व किनारपट्टीवरून या क्षेपणास्त्राचे उड्डाण झाले. हे क्षेपणास्त्र जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या (ईईझेड) बाहेर समुद्रात कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेनंतर जपान सरकारने आपल्या सागरी आणि हवाई वाहतूक यंत्रणांना तातडीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिसरातून जाणाऱ्या जहाजांना कोणत्याही संशयास्पद वस्तूजवळ न जाण्याच्या आणि तातडीने माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखालील राजवटीकडून गेल्या काही काळापासून सातत्याने प्रगत क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली जात आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात सुरू असलेल्या संयुक्त लष्करी सरावाला प्रत्युत्तर म्हणून प्योंगयांगकडून हे पाऊल उचलले जात असल्याचे मानले जाते. एकाच आठवड्यात दोनदा क्षेपणास्त्रे डागून उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय समुदायाला आणि विशेषतः शेजारील देशांना स्पष्ट राजकीय व लष्करी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेवर दक्षिण कोरियाच्या लष्करानेही बारीक लक्ष ठेवले असून, अमेरिकन संरक्षण यंत्रणांसोबत क्षेपणास्त्राच्या पल्ल्याचा आणि प्रकाराचा सखोल अभ्यास केला जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांचे उल्लंघन करून उत्तर कोरियाकडून वारंवार होणाऱ्या अशा चाचण्यांमुळे प्रादेशिक शांततेला मोठा धोका निर्माण झाल्याचे जपानने स्पष्ट केले असून, या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे




