ताज्या घडामोडी
Trending

सुब्रोतो मुखर्जी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा: संजीवन विद्यालयाची बाजी; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

सुब्रोतो मुखर्जी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा : संजीवन विद्यालयाची बाजी ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

​पन्हाळा : प्रसाद जाधव / एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १५ वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत पन्हाळा येथील संजीवन विद्यालयाने विजेतेपद पटकावले. या विजयासह संजीवन विद्यालयाच्या संघाने बंगळुरू येथे १ सप्टेंबरपासून होणाऱ्या राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व निश्चित केले आहे.

​अकोला येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर व अमरावती या आठ विभागांतील विजेत्या संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व संजीवन विद्यालय, पन्हाळा या संघाने केले.

​स्पर्धेतील पहिल्या सामन्यात संजीवन विद्यालयाने छत्रपती संभाजीनगर संघाचा ६-० असा एकतर्फी पराभव केला. यामध्ये शुभंकर भाटेने ४, तर पार्थ खवरेने २ गोल नोंदवले. त्यानंतर नागपूरविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात संजीवनने ५-० अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात शुभंकर भाटेने २, पार्थ खवरेने २ आणि प्रीत भोसलेने १ गोल केला.

​कोल्हापूर आणि पुणे यांच्यातील अंतिम सामना कमालीचा चुरशीचा ठरला. निर्धारित वेळेत हा सामना २-२ असा बरोबरीत सुटल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये कोल्हापूरच्या संजीवन संघाचा गोलरक्षक वीर पाटील याने अप्रतिम कामगिरी करत पुण्याचे ३ गोल रोखले आणि संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. संजीवनकडून शुभंकर भाटे, पुंशिबा सिंग, पार्थ खवरे व श्रेयस कोरवी यांनी अचूक पेनल्टी स्ट्रोक मारून संघाला विजेतेपद मिळवून दिले.

​विजेत्या संघात कर्णधार शुभंकर भाटे, वेदांत माळी, पियुष गायकवाड, प्रीत भोसले, सोहम माळी, श्रेयस कोरवी, आयुष जोशी, सार्थक हवालदार, वीर पाटील, पार्थ खवरे, पुंशिबा सिंग आणि जॅक्सन सिंग यांचा समावेश आहे.

​या यशाबद्दल संजीवन ग्रुपचे चेअरमन डॉ .पी. आर. भोसले, सहसचिव प्रा. एन. आर. भोसले, क्रीडा संचालक सौरभ भोसले तसेच प्राचार्य महेश पाटील यांनी खेळाडूंचे कौतुक केले असून पुढील लढतीसाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयी संघाला फुटबॉल प्रशिक्षक अमित साळुंखे, रणजीत विचारे, नितीन पाटील, संदीप जाधव आणि क्रीडा शिक्षक सागर पाटील व जयंत कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??