आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर ‘एफडीए’चा दणका ; पतंजलीचे २० लाखांचे गायीचे तूप जप्त, भेसळीचा संशय

तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर ‘एफडीए’चा दणका ; पतंजलीचे २० लाखांचे गायीचे तूप जप्त, भेसळीचा संशय

छत्रपती संभाजीनगर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर उघडलेल्या मोहिमेत नामांकित ‘पतंजली’ ब्रँडला जोरदार तडाखा बसला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर येथील एका गोदामावर अचानक छापा टाकून अधिकाऱ्यांनी पतंजलीचे तब्बल २० लाख २० हजार रुपये किमतीचे गायीचे तूप जप्त केले. तुपाच्या दर्जाबाबत संशय आणि वेस्टनावरील (पॅकिंग) माहितीबाबत नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली.

​गोदामावर अचानक छापा

विभागीय अन्न सुरक्षा पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. शहरातील सुंदरवाडी परिसरात केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या ‘मेसर्स दिव्य महावितरक’ या पतंजलीच्या अधिकृत वितरण केंद्राच्या गोदामावर एफडीएच्या पथकाने धाड टाकली. या गोदामात मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आलेल्या पतंजली ब्रँडच्या देशी गायीच्या तुपाची तपासणी केली असता, पॅकिंगवरील लेबल आणि नमूद माहिती अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील (एफएसएसएआय) नियमांशी विसंगत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

​२ हजार २७९ लिटरचा साठा सील

तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी विविध आकारांतील एकूण ४ हजार ३२ पॅकेट्स ताब्यात घेतली. यामध्ये सुमारे २ हजार २७९.७ लिटर तुपाचा समावेश असून, त्याची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत २० लाख २० हजार १९० रुपये इतकी भरते. तुपाच्या दर्जाबाबत आणि घटकांबाबत संशय निर्माण झाल्याने हा सर्व साठा तात्काळ सील करून ताब्यात घेण्यात आला.

​प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई

छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेल्या साठ्यातून नियमानुसार तुपाचे कायदेशीर नमुने गोळा करण्यात आले असून ते रासायनिक तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा कायद्यानुसार संबंधित वितरक तसेच उत्पादन करणाऱ्या कंपनीविरोधात पुढील कडक न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असे तपास पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

​भेसळखोरांवर कडक नजर

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. सणासुदीच्या काळात मागणीचा फायदा घेऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही घटकाला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनीही सीलबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील उत्पादन दिनांक, मुदत आणि परवाना क्रमांकाची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

https://nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??