सांगली जिल्हा बँक निवडणूक: पडळकर, घोरपडे, संजयकाका विजयी ; रोहित पाटील यांना धक्का, मिरजेत कोरे यांचा विजय

सांगली जिल्हा बँक निवडणूक: पडळकर, घोरपडे, संजयकाका विजयी ; रोहित पाटील यांना धक्का, मिरजेत कोरे यांचा विजय
मिरज : संजय पवार/ एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे अत्यंत चुरशीचे निकाल आज हाती आले. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या रणधुमाळीत जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तिन्ही प्रतिष्ठेच्या सोसायटी मतदारसंघांत धक्कादायक निकाल नोंदवले गेले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनी बाजी मारली आहे. दुसरीकडे, तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाला मोठा राजकीय धक्का बसला असून मिरजेत मात्र काँग्रेसचे वर्चस्व कायम राखत अण्णासाहेब कोरे यांनी दणदणीत विजय संपादन केला.
जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी तब्बल १५ जागांवर सर्वपक्षीय तडजोडीतून यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित जागांवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात एकमत न झाल्याने अखेर मतदान प्रक्रिया पार पडली. मिरज मार्केट यार्डातील शेतकरी भवन येथे आज सकाळी आठ वाजल्यापासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली.
जत विकास सोसायटी गटात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीचे विनोद पवार यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत आमदार पडळकर यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी विनोद पवार यांना ३४ मतांवर समाधान मानावे लागले. पडळकर यांनी तब्बल २० मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत जत तालुक्यावरील आपली राजकीय पकड दाखवून दिली.
कवठेमहांकाळ सोसायटी गटात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि महाविकास आघाडीचे व्ही. टी. पाटील यांच्यात अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला. माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या लढतीत अजितराव घोरपडे यांनी आपली जुनी राजकीय ताकद पणाला लावली. मतमोजणीत घोरपडे यांना ३७ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे पाटील यांना ३३ मते मिळाली. चार मतांनी निसटता पण निर्णायक विजय मिळवत घोरपडे यांनी जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा प्रवेश केला.
संपूर्ण जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव सोसायटी गटात दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी, माजी आमदार सुमनताई पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात पारंपारिक राजकीय ईर्ष्या पुन्हा पाहायला मिळाली. या गटातील लढत अखेरच्या फेरीपर्यंत श्वास रोखून धरायला लावणारी ठरली. मतमोजणीअंती संजयकाका पाटील यांना ४० मते मिळाली, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. अवघ्या दोन मतांनी विजय खेचून आणत संजयकाका पाटील यांनी तासगावमधील आपले राजकीय वजन पुन्हा सिद्ध केले, तर आमदार रोहित पाटील यांना तालुक्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
मिरज सोसायटी मतदारसंघात महाविकास आघाडीचे अण्णासाहेब कोरे विरुद्ध महायुतीचे भाजप उमेदवार अनिल शेगुणसे यांच्यात सामना झाला. खासदार विशाल पाटील यांनी मिरजेची सूत्रे स्वतःकडे घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या गटात अण्णासाहेब कोरे यांनी एकतर्फी वर्चस्व गाजवत ४७ मते घेतली, तर प्रतिस्पर्धी शेगुणसे यांना केवळ १९ मते मिळवता आली. कोरे यांच्या या घवघवीत विजयाने मिरज तालुक्यात काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे स्पष्ट झाले.
सकाळी अकरा वाजेपर्यंत सर्व जागांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शेतकरी भवनबाहेर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने मिरज परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.




