उचगावात साईराम हॉस्पिटलतर्फे ग्रामपंचायत व स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
आठ वर्षांची अविरत सेवा कौतुकास्पद : सरपंच मधुकर चव्हाण यांचे प्रतिपादन

उचगावात साईराम हॉस्पिटलतर्फे ग्रामपंचायत व स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
आठ वर्षांची अविरत सेवा कौतुकास्पद : सरपंच मधुकर चव्हाण यांचे प्रतिपादन
उचगाव : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा हाच धर्म मानून काम करताना डॉ. मंगेश माने आणि डॉ. मेघना माने यांनी गेल्या आठ वर्षांत उचगाव व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत. साईराम हॉस्पिटलने विश्वासार्ह रुग्णसेवेच्या माध्यमातून पंचक्रोशीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी केले.
येथील साईराम हॉस्पिटलच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व कर्मचारी आणि विशेषतः गाव स्वच्छ ठेवणारे स्वच्छता कामगार यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य नामदेव (एन. डी.) वाईंगडे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिवंगत माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दोन मिनिटांचे मौन पाळून डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शिवाजीराव माने, डॉ. मंगेश माने आणि डॉ. मेघना माने यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले की, उचगावसारख्या झपाट्याने विस्तारणाऱ्या परिसरासाठी साईराम हॉस्पिटल रुग्णांचा मोठा आधारवड बनले आहे. गावाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अशा घटकांसाठी हॉस्पिटलने घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असून या शिबिरामुळे अनेकांना व्याधीमुक्त जीवन जगण्यास मदत होईल.
हॉस्पिटलच्या प्रवासाबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते तसेच आमदार सतेज पाटील आणि प. पू. श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत या हॉस्पिटलचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. मंगेश माने आणि डॉ. मेघना माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय अविरत वैद्यकीय सेवा देत आहे.
प्रास्ताविकात डॉ. मंगेश माने म्हणाले की, उचगावची मोठी लोकसंख्या व भौगोलिक विस्तार पाहता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कामाचा सतत ताण असतो. दिवसरात्र सेवा बजावताना कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. याच भावनेतून त्यांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व वेळीच उपचार मिळावेत यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या आधुनिक उपचार सुविधांची सविस्तर माहिती दिली.
या शिबिरात युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग व ओम हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत रक्त तपासणी, ईसीजी (ECG), नेत्र तपासणी करण्यात आली तसेच आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देण्यात आले. या उपक्रमाचा सर्वाधिक लाभ ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घेतला.
या कार्यक्रमास उपसरपंच अरविंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर रंगराव चव्हाण, विनायक हावळ, ग्रामपंचायत सदस्य विराग करी, पृथ्वीराज चव्हाण, समुपदेशक प्रल्हाद कांबळे, आरोग्य मित्र मोहन सातपुते, जनसंपर्क अधिकारी पांडुरंग कांबळे, राहुल कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी व साईराम हॉस्पिटलचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




